हिंगोली येथील राज्य राखीव दलातील जवान राजकुमार पवार यांचा त्यांच्या सोबत असलेल्या मित्रानेच घात केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १८ पहाटे खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्यांचा मित्र बंडू शामराव चव्हाण याचा शोध सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या राखीव दलाचा जवान राजकुमार पवार (३५) हे त्यांचा मित्र बंडू चव्हाण याच्या सोबत मंगळवारी ता. १६ जांभरूनतांडा येथे पाहूण्यांकडे जेवण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात दोघेही कारने हिंगोलीकडे परत येत होते. यावेळी त्यांचा कारचा अन एका वाहनाला धक्का लागण्याच्या कारणावरून लोहगाव शिवारात वाद झाला होता. यावादातून किरकोळ हाणामारी देखील झाली. त्यानंतर वाद मिटला होता.
मात्र या वादाचा गैरफायदा घेऊन जवान राजकुमार पवार यांच्या सोबत असलेल्या बंडू शामराव चव्हाण (रा. जांभळीतांडा, ता. औंढा नागनाथ) यानेच राजकुमार पवार यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह लोहगाव शिवारातील विहिरीत टाकून पलायन केले. याबाबतची तक्रार जवान राजकुमार पवार यांचे वडिल उत्तमराव पवार यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून पोलिसांनी बंडू चव्हाण याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनेतिक संबंधातून खून झाल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बंडू चव्हाण हा फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार चव्हाण, रवीकांत हरकाळ, अशोक धामणे, गजानन पोकळे यांचे पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. मात्र आज पहाटे सहा वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नाही.