दिल्ली : देशातील इंधनाच्या किमतीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली असतानाच , पेट्रोल, डिझेल जीएसटीखाली आणून या किमती करण्याचा विचार केला जाईल अशी चर्चा सुरु होती , मात्र केंद्र सरकारने पेट्रोल , डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्यातरी पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची कोणतीही शक्यता नाही. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मागच्या वर्षभरात मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादनशुल्क वर्षभरात दुपटीने वाढविले आहे.
देशभरात सध्या इंधनाच्या वाढत्या किमती हा चिंतेचा विषय आहे. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यावर केंद्र सरकार उत्पादनशुल्क तर राज्य सरकारे व्हॅट आणि इतर अधिभार आकारणी करीत असल्याने इंधनाचे दर सध्या आकाशाला भिडले आहेत.
यावर पेट्रोल, डिझेल जीएसटीखाली आणण्याची शिफारस विविध अर्थतज्ञांनी केली होती. एसबीआयच्या अर्थतज्ञांनी देखील केंद्र सरकारला तसे सुचविले होते. मात्र सध्यातरी पेट्रोल, डिझेल जीएसटीखाली आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले आहे. जीएसटीमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश करायचा याचा निर्णय जीएसटी परिषद घेत असते. यात सर्व राज्यांचे प्रतिनिधी देखील असतात , मात्र परिषदेने अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सीतारामन म्हणाल्या.
वर्षभरात दुपटीने वाढले इंधनावरील उत्पादनशुल्क
मागच्या वर्षभरात पेट्रोलवरील उत्पादनशुल्क १९ रुपये ८० पैशावरून ३२ रुपये ९० पैसे इतके झाले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क वर्षभरात १५ रुपये ८३ पैशावरून ३१ रुपये ८० पैसे इतके झाले आहे. वर्षभरात उत्पादनशुल्कातही इतकी मोठी वाढ पहिल्यांदाच करण्यात आली आहे. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीच संसदेत ही माहिती दिली.
तर ७५ रुपये लिटर झाले असते पेट्रोल
जर पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला गेला तर इंधनाच्या किमती मोठ्याप्रमाणावर कमी होतील. जीएसटीमधील उच्चतम कर लावला आणि काही अधिभार गृहीत धरले तरी जीएसटीमध्ये आल्यानंतर पेट्रोल जास्तीत जास्त ७५ रुपये लिटर इतक्या दराने मिळू शकले असते असे अर्थतज्ञांचे मत आहे.
दुपटीने वाढला महागाईचा टक्का
इंधनाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो . इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक महागले आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतुकीमुळे वाढणारी महागाई म्हणून याकडे पहिले जाते. वर्षभरात या महागाईच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी या महागाईचा दर ६. ४४ % होता तो आता १२. ७९ % इतका झाला आहे.