Advertisement

राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

प्रजापत्र | Thursday, 11/03/2021
बातमी शेअर करा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड - १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी गुरुवारी ११ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असं म्हटलं होत की, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.

शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने जाहीर केले. परीक्षेची सुधारित तारीख यशावकाश जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 

Advertisement

Advertisement