महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केली आहे. अजित पवारांनी सांगितल्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणाही पवारांनी केली.
कोरोना काळात आरोग्य विभाग आणि आरोग्य सेवा किती महत्वाचा आहे, हे सर्वांच्याच लक्षात आहे. यामुळे, राज्यातील रुग्णालयांच्या पायाभूत सुविधेत वाढ करण्याचे ठरले आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांसाठी राज्यात मोठ्या रुग्णांलयांची गरज आहे. याशिवाय, राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, महापालिका परिसरात पाच वर्षात पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यावर्षी 800 कोटी देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
तसेच, पवार पुढे म्हणाले की, भंडारा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल. शिवाय, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1517 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य विभागाला 2900 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार असल्याचीही घोषणा यावेली करण्यात आली.