औरंगाबाद-शहरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवार किंवा मंगळवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणेने यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. आज किंवा उद्या यासंदर्भात घोषणाही होण्याची शक्यता असल्याचे शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली.
शहरात तीन दिवसात तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यामुळे कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालयात कोरोनाचे २,४०० सक्रिय रुग्ण दाखल आहेत. कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे प्रशासन आता कठोर निर्णय घेणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपासून १० दिवसांचा लॉकडाऊन लावण्यावर प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. तसेच परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.शहरातील जवळपास तीनशे कुटुंबातील सदस्य बाधित आहेत. शहरात बाधित रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. तीन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.