मुंबई दि.28 - अर्थ संकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर मी राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पुण्याचे पीआय… जे पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यांना निलंबित करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, सरकारने राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा आधीच विरोधकांनी सरकारला दिलाय. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे