Advertisement

पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोना

प्रजापत्र | Thursday, 25/02/2021
बातमी शेअर करा

वाशिम-दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड  यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.
कबिरदास महाराजांनी २१ तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. त्यादिवशी विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते. मात्र आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.
 संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. कोरोनाविषयक आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. कोविड काळात नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Advertisement

Advertisement