मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणते निर्बंध लागणार आणि लॉकडाऊन करावा लागणार का याची धास्ती राज्यातील जनतेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात थेट संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही,मात्र कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शिस्तीची गरज आहे,लोकांनी निर्बंध पाळावे लागतील.यात्रा,मिरवणूका,जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अमरावती, अकोला,यवतमाळ,नाशिक या चार जिल्ह्यात आवश्यकतेनुसार काही बंधने अंमलात आणायला सांगितले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहेत्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूसह काही भागात संचारबंदी लागणार आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले घरात बंद करून ठेवणं कोणालाच आवडत नाही. आपण खूप भयानक दिवस पाहिले आहेत. परिस्थिती कशी हाताळावी हे वर्षभरापूर्वी कोणालाही कळत नव्हतं. आताही औषध नाही, मात्र त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे लस उपलब्ध झाली आहे. आता कोव्हीड योद्धयांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ठाकरे यांनी केले. तसेच सर्वांना लस कधी मिळणार हे 'उपर वाले की मेहरबानी ' वर असल्याचा चिमटा त्यांनी काढला. सर्वांना लस उपलब्ध व्हायला आणखी ३-४ महिने तरी लागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. लाट आली की नाही हे १५ दिवसांनी कळेल,पण आपण शिथिल झालोय,गर्दी करतोय. शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे.काहीही सुरु करा म्हणून आंदोलन करणारे शिस्त पाळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अर्थचक्राला गती द्यायची होती, मात्र ती गती देत असतानाच कोरोना वाढतोय. अशावेळी शिस्तीची गरज आहे. कोव्हिड योद्धे होता आलं नाही तरी कोरोनाचे दूत तरी होऊ नका असे आवाहन ठाकरे यांनी केले.
जाहीर कार्यक्रम थांबवा,गर्दी होऊ देऊ नका,मास्कचा वापर करा असे आवाहन करत उद्यापासून यात्रा, जत्रा,मिरवणुका यावर बंदीची घोषणा ठाकरे यांनी केली.
प्रजापत्र | Sunday, 21/02/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा