पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार देशातील फक्त दोन उद्योजकांसाठी काम करत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना देशातील नागरिक अबकारी कराच्या रुपात ‘मोदी टॅक्स’ भरत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जर सरकारने अबकारी कर कमी केला तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर ६१ रुपये ९२ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलीटर ४७ रुपये ५१ पैसे इतका होईल असा दावा पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला.
“मे २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रत्येक बॅरेलमागे १०८ डॉलर इतकी होती. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१ रुपये ५१ पैसे इतका होता. १ फेब्रुवारी २०२१ला कच्च्या तेलाची किंमत प्रत्येक बॅरेलमागे ५४.४१ डॉलर असतानाही राजधानीत पेट्रोलचा दर मात्र ८९ रुपये २९ पैसे इतकाच आहे. तर डिझेलचा दर प्रतिलीटर ७९ रुपये ७० पैसे इतका आहे,” असं पवन खेरा यांनी सांगितलं.
पवन खेरा यांनी यावेळी मोदी सरकारने इंधनांच्या किंमतीतून देशाचे २० लाख कोटी लुटले असल्याचा गंभीर आरोप केला. “ते २० लाख कोटी कुठे गेले? कोणत्याही क्षेत्रात ते दिसले नाहीत. आपल्या काही मित्रांना फायगा व्हावा यासाठी हा केलेला गुन्हेगारी कट होता असं म्हणू शकतो का?,” अशी संतप्त विचारणा यावेळी त्यांनी केला. तसंच आपली कमतरता लपवण्यासाठीच केंद्र सरकार असे वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.