Advertisement

येडशीतील अग्नितांडवाने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

प्रजापत्र | Monday, 09/11/2026
बातमी शेअर करा

धाराशिव:जिल्ह्यातील येडशी गावात आज मध्यरात्री करंडे कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या, मांगल्याच्या आणि प्रकाशाच्या सणात एका कुटुंबावर काळाने असा घाला घालावा, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. ज्या घरात सणाचा आनंद आणि उत्साह असायला हवा होता, त्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्हा शोकसागरात बुडाला असून, या दुःखद प्रसंगात कारंडे कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.

 

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सहा जणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सरनाईक यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. कोणत्याही कुटुंबासाठी आपल्या प्रियजनांना अशा प्रकारे गमावणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाची तीव्रता शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. या कठीण प्रसंगी शासन आणि जिल्हा प्रशासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.या घटनेची सखोल चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधण्यात यावे. तसेच मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक व इतर आवश्यक मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.या दुर्घटनेतून जे कुटुंबीय बचावले आहेत, त्यांच्यावरही मोठा मानसिक आघात झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ आर्थिक मदत देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. त्यांना योग्य समुपदेशन, मानसिक आधार आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.एका निष्पाप कुटुंबाचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सहा जीवांचा अंत होणे ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी घटना आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी घरगुती वीजजोडण्या, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन बचाव व्यवस्थेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.या दुःखाच्या काळात करंडे कुटुंबीयांना धीर मिळावा, त्यांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement