धाराशिव : जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी धाराशिव शहरातील समता नगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संपर्क कार्यालयासह शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
आज दुष्काळ, पीकविमा, नुकसानभरपाई, कर्जबाजारीपणा आणि शासकीय कार्यालयांतील हेलपाटे अशा विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची आणि त्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढणाऱ्या व्यासपीठाची गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या, तक्रारी आणि न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत किटचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने अशा कुटुंबांपर्यंत मदतीचे किट घरपोच पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी नव्हे, तर आपले कर्तव्य असल्याची भावना यामागे व्यक्त करण्यात आली.
सत्ता असो अथवा नसो, जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याची शिवसेनेची भूमिका कायम राहणार आहे. पदासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख नंदुराजे ऊर्फ मकरंदराजे निंबाळकर, माजी आमदार दयानंद गायकवाड, संजय निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

