मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून ज्यांनी मराठा समाजाच्या मनावर स्वतःचे गारुड निर्माण केले असे मनोज जरांगे सध्या राजकीय टीकेचे लक्ष्य होताना दिसत आहेत.आंदोलनाच्या माध्यमातून आतापर्यंत मनोज जरांगे कोणालाही 'बाजार उठवू' असा इशारा द्यायचे आता त्याच मनोज जरांगे यांना 'उद्धवस्त करून टाकू' इथपासून ते 'तुझी औकात काय' इथपर्यंतच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे आणि या टीका देखील मराठा समाजातील नेत्यांकडूनच होत आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन उभारण्यात आणि त्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्यात मनोज जरांगे यशस्वी झाले होते,मात्र त्यानंतर त्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या राजकीय भूमिका,राजकीय नेत्यांना दिले जाणारे इशारे आणि आपण कोणाचाही बाजार उठवू शकतो असा स्वतःबद्दल निर्माण झालेला समज यामुळेच आता मनोज जरांगे यांची गोची होताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरून आंतरवलीमध्ये आंदोलन सुरु केले,त्यावेळी ते आंदोलन बिगर राजकीय राहिलं या विश्वासातून मनोज जरांगे यांच्याभोवती कानाकोपऱ्यातून समाज जमायला सुरुवात झाली होती.राजकीय पक्षांच्या सोयीच्या भूमिका आणि त्या पक्षातील नेत्यांना त्या भूमिकेप्रमाणे वागण्याची असलेली मर्यादा यामुळे आरक्षणासारख्या विषयात मनोज जरांगे या व्यक्तीमध्ये मराठा समाजातील अनेकांनी एक वेगळे नेतृत्व पाहिले.हाच माणूस आपल्याला न्याय मिळवून देईल असा विश्वास अनेकांना वाटायला लागला.अगदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गाव पातळीवरच्या सामान्य तरुणांपर्यंत प्रत्येकाला मनोज जरांगे एक आश्वासक चेहरा वाटत गेले आणि तेथूनच मग राजकीय नेत्यांना देखील मनोज जरांगे यांना आपलेसे करणे भाग पडले.मनोज जरांगे यांचे समाजातले महत्व इतके वाढले होते की अगदी अनेक वर्ष निवडून येणारे,सत्तेच्या सावलीतच वाढलेले आमदार-खासदार देखील अगदी जमिनीवर मांडी घालून मनोज जरांगे यांचा एक कटाक्ष आपल्यावर पडावा यासाठी धडपडताना देखील महाराष्ट्राने पाहिले.आता हे सर्वे लोक आपल्यासमोर बसतात म्हणल्यावर आपण कोणाचाही 'बाजार उठवू',कोणालाही 'कचका दाखवू' असे मनोज जरांगे यांना वाटणे साहजिक होते.मग तेच त्यांच्या भाषणांमधून व्यक्त व्हायला लागले.त्यांच्या भाषणातील शिवराळ भाषेवर देखील बेधुंदपणे चेकाळणारे समर्थक मनोज जरांगे यांना मिळत गेले आणि त्यातूनच मग 'आपण सारे राजकारण पाहिजे तसे फिरवू शकतो' हेच मनोज जरांगे यांना वाटायला लागले. लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका,विधानसभा निवडणुकीत अगोदर मराठा समाजाच्या लोकांनी अर्ज भर म्हणायचे,नंतर काढा म्हणायचे,पुढे कोणाला कुठे 'निरोप' द्यायचे अशा अनेक गोष्टी मनोज जरांगे आणि त्यांच्या मराठा सेवकांनी केल्या.यातून मराठा समाजाच्या नेतृत्वाला किती बळ मिळाले हा तसा संशोधनाचा विषय.आपला नेता ओबीसी नेत्यांवर टिका करतोय,कोणालाही 'घोडे लावतोय' याचा आनंद मानणारा वर्ग देखील होताच.पण आता तेच जरांगे थेट एकनाथ शिंदेंवरच टीका करायला लागले.इतकी की 'तुमच्यावरच गद्दारीचा डाग आम्ही पुसला' असे देखील जरांगे जाहीर बोलले.
मागच्या काही काळात,विशेषतः अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर एकनाथ शिंदेंकडे राज्यातला एक प्रभावी मराठा राजकीय चेहरा म्हणून पाहिले जात असताना मनोज जरांगे मात्र त्यांच्यावर पातळी सोडून टीका करतात हे शिवसैनिकांच्या सहनशक्तीपलीकडे गेले.कधीतरी हे होणार होते.आणि त्यातूनच स्वप्नील गलधर यांच्यासारखे एकेकाळी मनोज जरांगे यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते देखील 'जशास तसे उत्तर देऊ' म्हणण्याच्या पायरीवर आले. रामदास कदम यांनी त्या पुढची पायरी गाठत 'तुझी औकात काय?' असा थेट सवाल आता केला आहे.मनोज जरांगे जेव्हा ओबीसी नेत्यांवर टीका करायचे आणि त्याला छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे यांनी काही उत्तर दिले तर जरांगे समर्थक त्यांना ट्रोल करायचे,मात्र आता मनोज जरांगे यांच्यावर बोलणारे सारे 'आपलेच' अशावेळी करायचे तरी काय? असा प्रश्न नाही म्हटले तरी अनेकांसमोर आहेच.एकेकाळी आंदोलनात सोबत असलेले लोक टीका करतात म्हणल्यावर हे सारे खोटे आहे असे तरी कसे सांगता येणार ? मुळात मनोज जरांगे आंदोलक म्हणून समोर आले होते,मोठे झाले होते,त्यांनी कोणत्यातरी राजकीय नेत्याला शिव्या देण्याची किंवा कोणाचा तरी 'बाजार उठविण्याची' भूमिका घेणेच गैर,आतापर्यंत ते ओबीसी नेत्यांचा बाजार उठविण्याचे बोलायचे तेव्हा इतरांना आनंद होत होता,आता ते मराठा समाजाच्या नेत्यांना 'कचका दाखविण्याची' भाषा बोलायला लागले म्हणल्यावर मराठा समाजातील नेते गप्प राहतील तरी कसे ? त्यामुळे आता जरांगे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येते याची सुरुवात शिवसेनेने केली आहे.आगामी काळात बोलणारी तोंडे निश्चितपणे वाढतील. राजकीय भूमिका घेतल्याने झालेली ही गोची मनोज जरांगे यांना काचणारी ठरणार आहेच,पण यामुळे आंदोलनाची जी धार निर्माण झाली होती त्याच्यावर देखील निश्चितच परिणाम होणार आहे.

