Advertisement

माजलगाव अपघात प्रकरण: कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पाच बळी

प्रजापत्र | Sunday, 18/10/2026
बातमी शेअर करा

माजलगाव : खामगाव-पंढरपूर सिमेंट महामार्गावर सुरू असलेल्या निकृष्ट आणि सदोष कामामुळे रविवारी एका भीषण अपघातात पाच निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेला थेट गुत्तेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत, 'दिलीप बिल्डकॉन' (DBL) कंपनीचे ठेकेदार आणि संबंधित अभियंत्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला शिंदेवाडी फाट्यावरील खड्ड्यांमुळे उसळी मिळून ती थेट एसटी बसवर आदळल्याने हा अनर्थ ओढवला.

या घटनेप्रकरणी शिपे टाकळी (ता. माजलगाव) येथील ज्ञानेश्वर महादेव गिरी (वय २६) यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने अत्यंत बेजबाबदारपणे खड्डे, धोकादायक चढ-उतार आणि भेगा तशाच सोडल्यामुळेच हा अपघात घडल्याचा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अंभोरे यांच्याकडे पुढील तपासाची सूत्रे सोपवली आहेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास गजानन महादेव नामदास (वय ३५) हे स्वतःची हुंडाई आय-२० कार (MH26 AK4210) चालवत तुळजापूरकडे जात होते. त्यांच्यासोबत ओंकार महादेव गिरी (२०), समर्थ गजानन नामदास (१२), ऋतिक मोतीलाल बडे (१८) आणि अनिल सेन हेदेखील प्रवास करत होते. त्यांची कार माजलगाव हद्दीतील शिंदेवाडी फाट्याजवळ पोहोचली असता, रस्त्यातील खड्ड्यामुळे ती अनियंत्रित होऊन हवेत उडाली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला (MH20BL2740) धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि आतील पाचही जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी पाच जणांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे.

Advertisement

Advertisement