Advertisement

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही!

प्रजापत्र | Saturday, 17/10/2026
बातमी शेअर करा

पुणे : नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असला, तरी महायुती सरकार या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. दुष्काळी मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असला, तरी सण गोड व्हावा यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी ५,००० रुपयांची अग्रिम (आगाऊ) मदत थेट बँक खात्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे," असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळी उपाययोजना, केंद्राची मदत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्यायव्यवस्थेविरोधातील आंदोलनावर जोरदार टीकास्त्र सोडले.

दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नियमानुसार मदत वितरणाला वेळ लागतो. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी ५,००० रुपयांचा तातडीचा अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्राला केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

राहुल गांधींना जनतेची दिशाभूल करण्याचेच काम!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावर कडाडून टीका करताना शिंदे म्हणाले, "देशाच्या इतिहासात विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. विरोधी पक्षनेतेपदावर बसलेल्या व्यक्तीला संविधानाचा विसर पडला आहे का?" हातात संविधानाचे पुस्तक घ्यायचे आणि प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांवर आणि न्यायव्यवस्थेवरच प्रहार करायचा, ही विरोधकांची दुटप्पी वृत्ती असल्याचे ते म्हणाले.

 

देशाचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखतेय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, देशाची भरभराट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश पाहून विरोधकांच्या पोटात दुखत असून, त्यातूनच ते देशाला बदनाम करण्याचा कुटिल डाव रचत आहेत. मात्र, देशातील जनता सुजाण असून विरोधकांचा हा खोटा नॅरेटिव्ह आणि अपप्रचार हाणून पाडेल, असा घणाघात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

Advertisement

Advertisement