Advertisement

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार

प्रजापत्र | Thursday, 15/10/2026
बातमी शेअर करा

धाराशिव प्रतिनिधी : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बळीराजाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या वतीने मदतीचा पुढाकार घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळी किट तयार करण्यात आले असून, त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

 

या दिवाळी किटमध्ये फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय आदी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांनाही दिवाळी किटचे वाटप केले जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

 

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत दिवाळीचे साहित्य पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात बळीराजाच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे, हीच या उपक्रमामागील भावना आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून, त्यांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement