Advertisement

बीडच्या मातीतील अस्सल कलावंत हरपली!

प्रजापत्र | Monday, 12/10/2026
बातमी शेअर करा

बीड: प्रजापत्र  नेटवर्क 

बीड जिल्ह्याच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या लावणीच्या ठसक्याने व दमदार अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर (वय ७३) यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर आणि मराठी कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

बीडशी घट्ट नाळ: माळेगावमध्ये जन्म आणि शिक्षण

मधू कांबीकर ऊर्फ मधू वामन जाधव यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. कोल्हाटी समाजातील कलापरंपरेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण माळेगाव येथे, तर पुढील सातवीपर्यंतचे शिक्षण 'कांबी' या गावी पूर्ण झाले. लहानपणापासूनच लोककलेचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी अतिशय लहान वयात रंगमंचावर पाऊल ठेवले. तमाशाच्या फडातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पुढे रुपेरी पडद्यापर्यंत गेला. त्यांनी लावणी आणि तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला प्रकारांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

 

'नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री'

मधू कांबीकर यांच्या अभिनयाची ताकद एवढी मोठी होती की, खुद्द ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या 'लमाण' या आत्मकथनात "मधू कांबीकर या नुसतीच उत्तम नर्तिका नाहीत, तर उत्तम अभिनेत्री आहेत" असा विशेष उल्लेख करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.

 

चित्रपटसृष्टीतील सोनेरी प्रवास आणि पुरस्कार

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. 'हेच माझं माहेर', 'राघुमैना', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला', 'डेबू' आणि 'येऊ का घरात' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल 'शापित' चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मराठी) पुरस्कार, तसेच राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. 'रावसाहेब' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, हंसा वाडकर विशेष पुरस्कार आणि २००७ मध्ये लावणी कलावंत पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

 

'सखी माझी लावणी हरपली'

मधू कांबीकर यांच्या निधनानंतर लावणी कलावंत आणि अभिनेत्री मेघा घाडगे यांनी समाजमाध्यमांवर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. "मधूताई... 'सखी माझी लावणी' हरपली! लावणीचा ठसका आणि पडद्यावरच्या जिवंत अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. 'एक होता विदूषक'मधील त्यांची लावणी आपण कधीही विसरू शकणार नाही," अशा शब्दांत मेघा घाडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Advertisement

Advertisement