बीड दि.११ (प्रतिनिधी)-मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत अजय बारस्कर यांनी ईडीकडे बीड,जालना जिल्ह्यातील वाळू तस्करीची तक्रार दिलेली असतानाच आता बीड जिल्हा प्रशासनाने देखील वाळू तस्करी भोवतीचा कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.शुक्रवारी महसूल आणि पोलिसांच्या पथकाने मोठ्या फौजफाट्यासह राक्षसभवन आणि म्हाळसजवळा याठिकाणी वाळू तस्करीच्या संदर्भाने अनेक वाहनांवर कारवाई केली आहे.
जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु झाल्यानंतर लगेच अजय महाराज बारस्कर यांनी या आंदोलनाचा संदर्भ देत थेट ईडीकडे तक्रार केल्याचे सांगितले होते.आंदोलनाच्या आसपास वाळू तस्कर असल्याचा आरोप देखील अजय बारस्कर यांच्यासह अनेकांनी यापूर्वी देखील केला आहे.दरम्यान एकीकडे आपण ईडीकडे गेल्याचे बारस्कर यांनी सांगितल्यानंतर बीडच्या महसूल प्रशासनाने बीड जिल्ह्यातील वाळू तस्करीवर कारवाईचा फास आवळला आहे.म्हाळसपिंपळगाव व राक्षसभुवन येथे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कारवाई उपविभागीय अधिकारी गेवराई शुभम पवार व तहसीलदार शिरूर का. श्री सुरेश घोळवे यांच्या नेतृत्वाखाली बीड व गेवराई मधील महसूल अधिकारी व परिवीक्षाधीन पोलिस उपाधिक्षक भरत पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस विभाग कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उत्खननात सहभागी वाहने व साधने जप्त केली तसेच उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या किन्हीच्या दोऱ्या नष्ट करण्यात आल्या. जवळपास १२-१४ ट्रॅक्टर, १ लोडर व ट्रॉली ,५-७ किन्हीच्या मशीन्स जप्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान महसूल विभागाने मागच्या आठवड्यात एकूणच अवैध गौण खनिज उपशाला लक्ष्य केले आहे. काही दगड खंडणी बंद करण्यात आल्या आहेत तर मुरूम उपसा देखील कारवाईच्या अजेंड्यावर आहे.
अवैध धंद्यांवर कारवाया वाढल्या
बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी अवैध धंदे चालणार नाहीत असे सांगितले होते. तरीही जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले नव्हते. आता मागच्या आठ दहा दिवसांपासून अचानक पोलिसांनी अवैध धंद्यांवरच्या कारवाया वाढविल्या आहेत.परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पांढरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी देखील अवैध धंद्यांवर मोठ्याप्रमाणावर कारवाया सुरु केल्या आहेत.अवैध धंद्यांसह गुटखा आणि इतर तस्करी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. त्यामुळे पोलिसांना नेमकी कोणती वेळ 'साधायची'आहे याच्याही चर्चा सुरु आहेत.
उत्पादन शुल्क देखील सक्रिय
महसूल, पोलीस विभागासोबतच जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग देखील अचानक अंग झटकून कामाला लागला आहे. मागच्या चार पाच दिवसात या विभागाच्या कारवाया देखील आश्चर्यकारकरित्या वाढल्या आहेत.
काळ्या पैशाची रसद
बीड आणि लगतच्या जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या माध्यमातून जो काळ पैसे निर्माण होतो, त्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. या काळ्या पैशाची रसद अनेक ठिकाणी जाते आणि त्यातून काहींना बळ मिळते असा सरकारचा अंदाज आणि माहिती आहे.अशा लोकांची रसद तुटावी म्हणून तर या साऱ्या कारवायांची चाके वेगाने फिरू लागली नाहीत ना अशी चर्चा सध्या जोरात आहे.

