Advertisement

पपईचा ट्रक उलटून १५ मजूर जागीच ठार

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

जळगावातील यावल-चोपडा रस्त्यावर खड्ड्यामुळे काळाने डाव साधला. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत मजूर रावेर तालुक्यातील आभोडा,केन्हाळा व रावेर शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास पपयांचा ट्रक पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. यावल-चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे निघाला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयावर मजूर बसले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते. हे खड्डे चकवण्याच्या नादात चालकाचा वाहणावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक पलटी झाल्याचं काही प्रथमदर्शींनी सांगितलं.

या दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग आला. पहिल्यांदा पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची  नावे -१) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (३० वर्ष, २) सरफराज कासम तडवी (३२ वर्ष),३) नरेंद्र वामन वाघ (२५ वर्ष),४) डिंगबंर माधव सपकाळे (५५ वर्ष), ५) दिलदार हुसेन तडवी (२० वर्ष) ,६)संदीप युवराज भालेराव (२५ वर्ष), ७) अशोक जगन वाघ (४० वर्ष), ८) दुर्गाबाई संदीप भालेराव (२० वर्ष), ९)गणेश रमेश मोरे (५ वर्ष), १०) शारदा रमेश मोरे (१५ वर्ष), ११) सागर अशोक वाघ (३ वर्ष), १२ ) संगीता अशोक वाघ (३५ वर्ष), १३ ) सुमनबाई शालीक इंगळे (४५ वर्ष), १४) कमलाबाई रमेश मोरे (४५ वर्ष),१५) सबनूर हुसेन तडवी (५३ वर्ष)

Advertisement

Advertisement