गेवराई दि.३(प्रतिनिधी): तालुक्यातील नागझरी येथील गोदावरी नदीच्या पात्रातील बंधाऱ्याजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह वाहून आलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी नागरिकांना मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुनी नागझरी शिवारातील बंधाऱ्याच्या पाण्यात एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती गेवराई पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह गोदावरी नदीच्या पाण्याच्या पात्रातून वाहून आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वयः अंदाजे ३० ते ३५ वर्षे मृतदेह पूर्णपणे पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.या अज्ञात इसमाबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास किंवा हा तरुण बेपत्ता असल्याबाबत काही संशय असल्यास तातडीने गेवराई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
