जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण ( सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले,तसेच आंदोलनापासून दूर राहणाऱ्या राजकीय नेत्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. ५८ लाख नोंदीचे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं.आता वेळ देता येणार नाही. आम्हाला गावागावातून फोन आले पाहिजेत. इतकी गती सरकारने घ्यायची आहे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले त्यांची व्हॉलिडीटी द्या. हैदराबाद गॅझेटमधील संख्येनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.आम्हाला सांगतो, करतो म्हणायचे नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिले त्याची व्हॉलिडिटी द्या. सरकारला आता पळायला जागा नाही. ते कोणी अर्ज केला नाही म्हणून म्हणू शकत नाही. औंध, पुणे, सातारा गॅझेटिअरचा जीआर अंमलबजावणी करा, तसेच मराठ्यांनी सरकारवर भरोसा ठेवायचे बंद करा. आपला नेता कोण नाही," असे त्यांनी म्हटले.मनोज जरांगे पुढे म्हणाले की, "स्वार्थाने दुनिया भरली आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो आहे. सरकारने महाराष्ट्रातील सर्व केसेस मागे घ्याव्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि मदत द्यावी. मराठ्यांच्या लेकरांनी आता वाट बघायची नाही. तातडीने अंतरवालीकडे वेळ मिळेल तसं वेळ द्यायची आहे. हा शेवटचा लढा आहे. म्हणून मी समाजाला हाक दिली. आपण आज घराबाहेर पडलो नाही तर आपण कायम गरीब राहणार आहोत. आपल्या लढ्यामुळे पुढच्या पिढ्याचं कल्याण होणार आहे."
आपण विजयाच्या उंबरठ्यावर
मला उद्यापासून बोलता येणार नाहीये.त्यामुळे आज मी समाजापुढेच माझं म्हणणं मांडतोय.आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत,आता माघार नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लढतोय,आता हा अखेरचा लढा आहे. गाफील न राहता, घरात बसून न राहता आता मुंबई असो किंवा अंतरवाली सराटी असो आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे, असे आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केले.
मराठा नेत्यांना दिला थेट इशारा
यावेळी राजकीय नेत्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, "आपल्या गावातील कोणता राजकीय नेता आंदोलनात आला नाही हे फक्त मला सांगा. सरपंच, सभापती, सदस्य, नगरसेवक, महापौर, जिल्हाप्रमुख, माजी- आजी सर्व आमदार, खासदार माजी मंत्री, संस्थावाले, श्रीमंत मराठा, नोकरदार हे बाहेर पडले नाहीत तर फक्त मला सांगा. पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवणार, असा थेट इशारा त्यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.

