मुंबई : 'पंढरीची वारी' ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची 'लालपरी' विश्वासाची सोबती ठरली.
आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा
