परळी वैजनाथ दि.२०(प्रतिनिधी):शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकाजवळील गणेशपार रोडवरील रामा आईस्क्रीम पार्लरमध्ये रविवार (दि.१९) रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास चार-पाच जणांनी दुकानात घुसून व्यापारी गोरख मोरे यांच्यावर तुंबळ हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एका आरोपीने मोरे यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हे भांडण का झाले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चार जण दुकानात घुसल्यानंतर त्यांनी गोरख मोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका हल्लेखोराने बियरची बाटली डोक्यात फोडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी गोरख मोरे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या गंभीर प्रकृतीचा विचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

