दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांबरोबर २१ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा देत आंदोलनस्थळी भेटी दिल्या. मात्र, आज (१८ जुलै) सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला पूर्णविराम मिळणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत असतानाच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या संपूर्ण घडामोडी दरम्यान जंतर-मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.या घडामोडी दरम्यानच अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. अभिजित दीपके यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यामुळे जंतर-मंतरवर पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

