Advertisement

 एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला स्थगिती

प्रजापत्र | Thursday, 16/07/2026
बातमी शेअर करा

 मुंबई: राज्य लोकसेवा आयोग तर्फे यंदापासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या निर्णयास विद्यार्थ्याकडून झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत ही परीक्षा एक वर्षासाठी स्थगित करण्याचे आदेश लोकसेवा आयोगाला दिले आहेत.

   ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याबाबत सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्या अनुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

Advertisement

Advertisement