मुंबई : 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सोलापूरमधील नोबल रुग्णालयाच्या मेडिकलबाबत करण्यात आलेल्या आरोपांची दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने संबंधित ठिकाणी तपासणी करून गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मेडिकलविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अरबाज शेखने आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान नोबल रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर FDA चे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आणि मेडिकलची तपासणी केली.
तपासादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तपासात कोणत्या त्रुटी आढळल्या?
FDA च्या तपासात औषधांच्या प्रिस्क्रिप्शनशी संबंधित आवश्यक माहिती अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णांना रुग्णालयाबाहेरील कोणत्याही अधिकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार आहे, याबाबतचा फलकही मेडिकलमध्ये लावलेला नसल्याचे आढळले.
या बाबी आयुक्तांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या त्रुटी गंभीर असल्याने संबंधित मेडिकलला औषध विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके काय आरोप केले होते?
अरबाज शेखच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांच्यावर सोलापूरमधील नोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप त्याने केला होता.त्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील मेडिकलमधून घेतलेल्या औषधांसाठी सुमारे 40 हजार रुपयांचे बिल आले, तर तीच औषधे बाहेरील मेडिकलमध्ये जवळपास 20 हजार रुपयांत उपलब्ध झाली असती, असा दावा त्याने केला होता.
यासोबतच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचाही आरोप करत त्याने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते.

