बीड दि. २५ (प्रतिनिधी ) : राज्य सरकारने वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी नियम घालून दिले आहेत. महसूल विभागात एखाद्या कर्मचाऱ्यांची एका पदावर तीन वर्ष झाल्यानंतर बदली करावी असे धोरण आहे,हे धोरण राज्यात राबविले जात असले तरी बीड जिल्ह्यात मात्र अधिकाऱ्यांच्या मनात येईल तो कायदा अशी परिस्थिती असून लाडके कर्मचारी हलवावे लागू नयेत म्हणून तीन वर्षाच्या नियमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.
बीडच्या महसूल विभागातील बदल्या मागच्या वर्षी देखील वादग्रस्त ठरल्या होत्या, याहीवेळी आता त्या बदल्यांवर अधिकाऱ्यांच्या मनमानीचा शिक्का बसत आहे. कर्मचाऱ्याला एका पदावर तीन वर्ष झाल्यास त्याचा टेबल बदलायचा आणि ६ वर्ष झाल्यास मुख्यालय बदलाचे असा शासनाचा सुस्पष्ट नियम आहे. राज्यातील बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्याच नियमाच्या आधारे केल्या. बीडचे अधिकारी मात्र हा नियम मानायला तयार नाहीत, येथे सहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, मात्र एकाच पदावर तीन वर्ष झालेल्यांच्या बदल्या करण्याची मानसिकता प्रशासनाची नाही. आस्थापनेपासून अनेक विभागात काही कर्मचारी तीन वर्षापेक्षा अधिक काळ त्या पदावर आहेत, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष मर्जीतले, लाडके असल्याने त्यांच्या पडला धक्का लागू नये म्हणून शासनाच्या नियमांना देखील सुरुंग लावण्यात अधिकारी मागेपुढे पाहत नसून प्रशासनाच्या 'विवेकाला ' झाले तरी काय असे म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. इतरवेळी नियमांचा दाखल देणारे जिल्हाधिकारी या प्रकरणात मात्र नियमांना बायपास का करत आहेत हा प्रश्न देखील कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.
विनंती बदलीचा घाट
तीन वर्ष या नियमाच्या संदर्भाने कर्मचारी संघटनांनी अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, तेथे प्रतिसाद न मिळाल्याने ते आयुक्तांना भेटले , आयुक्तांनी खाली सूचना देखील केल्या, पण बीडचे नियम वेगळेच. आता ज्यांना एका पदावर तीन वर्ष झाली आहेत, त्यांना विनंती बदली हवी असेल तर अर्ज करावेत असे पात्र जिल्हा प्रशासनाने काढले आहे, आता जे मलईदार पदांवर ठाण मांडून बसले आहेत ते विनंती करतील कशाला ? या बाबी कर्मचारी संघटना अधिकाऱ्यांना ओरडून सांगत असल्या तरी प्रशासन मात्र 'बहिरे ' बनले आहे.
संघटनेने निवेदन दिले, बहिरवर कारवाई शून्य
आस्थापना विभागातील एक कर्मचारी सचिन बहिर याच्यावर प्रत्येक फाईलसाठी आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप करत कर्मचारी संघटनेने त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र या कर्मचाऱ्याला याचा साधा जाब देखील विचारण्यात आला नाही. आणि कसलीही कारवाई देखील झाली नाही.

