मुंबई : इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर निर्बंध आणल्यामुळे भारतात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पेट्रोल-गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी लोक पॅनिक होऊन पंपांवर गर्दी करीत आहेत. तर एलपीजी गॅससाठीदेखील पॅनिक बुकिंग सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल वितरणावर निर्बंध घालून देण्यात आलेले असून एलपीजी गॅस बुकिंगचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर देशामध्ये आता पुन्हा 'रॉकेलपर्व' येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण गॅस नसेल तर पर्यायी इंधन असणं तेवढंच आवश्यक आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मार्च-एप्रिल या महिन्यामध्ये ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर केलाय. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे, त्यांना प्रत्येक रेशनकार्डसाठी ३ लिटर रॉकेल दिलं जाईल.ज्या कुटुंबाकडे पीएचएच रेशनकार्ड आणि अंत्योदय रेशनकार्ड आहे, त्या कुटुंबांना प्राधान्याने रॉकेल वितरित केलं जाणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे घरगुती गॅसचं कनेक्शन नाही, त्यांना प्राधान्याने रॉकेल मिळेल. ज्याप्रमाणे पूर्वी स्वस्त धान्य दुकानांवर रॉकेल मिळायचं, तसंच आताही मिळेल. त्यात थोडी सुधारणा होत असून शहरी भागांमध्ये पेट्रोल पंपांवरही रॉकेल मिळणार आहे.भविष्यात तुम्हाला रॉकेल पाहिजे असेल तर ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्ड अपडेट करावं लागेल. हे तुम्ही स्वतः देखील करु शकता. त्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवरुन कार्ड अपडेट करावं लागेल. वेबसाईटवरील ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनमध्ये जाऊन एडिट रेशनकार्ड या पर्यायावर क्लिक करा. पुढे कार्डवरील ज्या सदस्यांचे आधार लिंक नाही त्यांचे आधार लिंक करा, त्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे जोडा. जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तोही करावा.तुमच्या कुटुंबातील सदस्यांची आधार लिंक नसणे, मोबाईल नंबर शिधापत्रिकेशी जोडलेला नसणे, सदस्यांची नावे आणि इतर माहितीमध्ये त्रुटी असणे, यामुळे अडचण येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड अपडेट करा तरच रॉकेलचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे घरबसल्या UMANG अॅपवरुनही सोप्या पद्धतीने रेशन कार्ड अपडेट करता येईल.

