Advertisement

 टिप्परच्या धडकेत कारला आग माय-लेकराचा होरपळून मृत्यु 

प्रजापत्र | Friday, 27/03/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.२७ (प्रतिनिधी): तालुक्यातील कापसी फाट्यावर टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या  भीषण अपघातात कारमधील माय-लेकराचा जागीच होरपळून मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२७) रोजी सकाळी घडली आहे.
    अधिक माहितीनुसार,श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय ४२) आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २५) हे कारने आष्टीकडून बीडकडे जात होते. कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली. या भीषण धडकेनंतर कारने पेट घेतला, ज्यामध्ये माय-लेकराला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

 

दीड तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह काढले बाहेर

अपघाताची भीषणता एवढी होती की, कारचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.वडील कीर्तनात असतानाच काळाचा घाला.श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement