Advertisement

भीषण अपघातात पती पत्नीसह तीन जण ठार

प्रजापत्र | Monday, 08/02/2021
बातमी शेअर करा

पुणे दि.८ (प्रतिनिधी)-भरधाव फॉर्च्युनर कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे एकाच कुटुंबातील आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, फॉर्च्युनर गाडी व त्यातील जखमींना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.

           पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळ डाळज नं. २ च्या हद्दीत (ता. इंदापूर जि. पुणे) रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यात गीता अरुण माने (वय ३६) मुकुंद अरुण माने (२५) व अरुण बाबूराव माने (४५ तिघे रा. लातूर जि.लातूर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर साक्षी अरुण माने (१८), महादेव रखमाजी नेटके (५६ रा.लातुर) हे जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त ट्रॅक्टर (एम.एच.४५ एफ.७७७९) पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं निघाला होता. डाळज नं. २ येथे त्याच दिशेने फॉर्च्युनर कार (एम.एच.२४ एटी.२००४) भरधाव वेगाने येऊन ट्रेलरला पाठीमागून धडकली. या भयंकर अपघातात कारचा चक्काचूर झाला. यातील मृत्यूदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. जखमींना तातडीने उपचारासाठी भिगवण व पुणे येथे पाठवण्यात आले, मात्र उपचारांआधीच तिघांचा मृत्यू झाला, तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यामुळं वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती. भिगवण पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करून दिली. पुढील तपास भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष रुपनवार करीत आहेत.

Advertisement

Advertisement