Advertisement

अंबाजोगाईत दहा लाखांचा गांजा जप्त

प्रजापत्र | Thursday, 05/03/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.५ (प्रतिनिधी):बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने बुधवार (दि.४) रोजी सायंकाळी कारवाई करत १० लाख ८०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नितीन लिंबाजी कांदे (वय ३०), रा. कांदेवाडी याला रंगेहात पकडले असून, त्याचे दोन साथीदार भाऊसाहेब चौधरी आणि बबलू उर्फ व्यंकटेश फड हे पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ पट्टीवडगाव रोडवरील एका शेतात ही कारवाई करण्यात आली.

      अधिक माहितीनुसार,आरोपी नितीन कांदे आणि भाऊसाहेब चौधरी हे दोघे गांजा घेऊन धर्मापुरी येथील भास्कर रोकडोबा फड याच्या शेतातील पत्र्याच्या खोलीत विक्रीसाठी आले होते. हा गांजा भास्कर फड याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने मागवला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह धर्मापुरी शिवारात छापा टाकला. या ठिकाणी दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये पान,फुले आणि बियांसहित दाबेलेला उग्र वासाचा गांजा पोलिसांना मिळून आला.

 

जप्त केलेल्या गांजाच्या एका पोत्याचे वजन २४ किलो ५६० ग्रॅम आणि दुसऱ्या पोत्याचे वजन ८ किलो ८०० ग्रॅम असे एकूण ३३ किलो ३६० ग्रॅम भरले. बाजारभावाप्रमाणे याची किंमत प्रति किलो ३० हजार रुपये असून एकूण मुद्देमाल १० लाख ८०० रुपयांचा आहे. या प्रकरणी पो.ह.महादेव आवळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कांबळे आणि त्यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला असून फरार आरोपी भाऊसाहेब चौधरी आणि बबलू फड यांचा पोलीस शोध घेत आहेत.  या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement