मुंबई : अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला ११८ जागांसह काठावरचं बहुमत मिळालं होतं. त्यात भाजपाने ८९ जागा जिंकल्या, तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून महापौरांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर २९ जागांसह मुंबई महानगपालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महानरपालिका निवडणुकीत महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने यावेळी मुंबईत आपलाच महापौर बसेल, अशी भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाची गाडी ८९ जागांवर जाऊन थांबली. त्यामुळे मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिंदेसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांपासूनच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याच्या परंपरेचा हवाला देत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भाजपाने मुंबईत आपल्याला सन्मानपूर्वक पदं सोडावीत, अशी भूमिका शिंदेसेनेने घेतली आहे, त्यामुळे मुंबईत महापौरपदावरून भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल, असं विधान केलं होतं. तसेच महापौरपदावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदेसेनेच्या नगरसेवकांना उद्देशून उद्धवसेनेकडून भावनिक विधाने केली जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदावरून मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिंदेसेनेच्या विजयी झालेल्या सर्व २९ नगरसेवकांची हॉटेलमध्ये रवानगी केली आहे.

