राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला शेतकर्यांच्या मुद्दय़ावरून देशी-विदेशी सेलिब्रिटींच्या विधानांबद्दल सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'देशातील नामांकित व्यक्तींनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बरेच लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. म्हणून मी सचिन तेंडुलकर यांना सल्ला देईन की इतर कोणत्याही क्षेत्राबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.'
गायिका रिहाना, पॉर्न स्टार मिया खलिफा आणि अॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थुनबर्ग यांच्या शेतकर्यांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या वक्तव्यावर सचिन तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. यात सचिनने देशातील जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले होते.
सचिनने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले होते?
सचिनने लिहिले, 'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक बनू शकतात मात्र भागीदार होऊ शकत नाहीत. भारतीयांना त्यांचा देश समजतो आणि ते त्या दृष्टीने निर्णय घेऊ शकतात. एक देश म्हणून आपण एकजूट राहिले पाहिजे.
सचिनला ट्रोल करण्याचा प्रयत्नही झाला
असेच विधान भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहलीनेही केले होते. यानंतर सचिन आणि विराटला ट्रोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले आणि ते शेतकरी चळवळीच्या विरोधात असल्याचे सांगितले. तथापि, सचिनने कोठेही लिहिले नाही की तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की, त्यांच्या बाजूने आहे. तो केवळ म्हणाला होता की, देशाबाहेरच्या लोकांनी भारताशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवर वक्तव्य करणे टाळले पाहिजे.