मानखुर्दमध्ये भीषण आग लागल्याची माहिती आहे. मंडला परिसरातील एका केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली. धुराचे मोठे लोळ हवेत पसरत असलेले दृष्य समोर आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या आहे. मात्र ही आग भीषण असल्याचे दिसत आहे. आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 19 गाड्या दाखल झाल्या आहेत.
दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती आहे. मानखुर्द येथील कुर्ला स्क्रॅपमध्ये ही भीषण आग लागली. आगीचे लोळ दुरुनच दिसत आहे. सध्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती असल्याचीही माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची तीव्रता पाहून आजुबाजूचे परिसर रिकामे करण्यास सुरुवात झाली आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. यामुळे या गोदामांनाही आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.