बीडः केंद्र सरकारच्या टोकाच्या हटवादी पणानंतरही राजधानी दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या आंदोलनाने आता 70 दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. जसजसे आंदोलन वाढत आहे तसतसा आता या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळत आहे. रिहाना असेल किंवा मिना हँरिस किंवा ग्रेटा थनबर्ग, यांनी आंदोलकांच्या बाजुने ट्विट काय केले, भारतातील अनेकांना मिरच्या झोंबल्या आहेत. या भक्तांना लगेच हे आंदोलन हा ‘देशाचा आंतर्गत विषय’ वाटू लागला असून ते यात विदेशी हस्तक्षेप नको म्हणून छात्या बडविताना दिसत आहेत. मात्र आंदोलकांच्या बाजुने झालेल्या ट्विट नंतर छात्या बडवू लागलेले हेच भक्तगण ज्यावेळी अमेरिकन निवडणूकीच्या अगोदर आपले पंतप्रधान अमेरिकेत ‘अबकी बार ट्रम्प सरकार ’ च्या घोषणा देत होते, त्यावेळी टाळया पिटत होते, मग आजच त्यांना ‘देशांतर्गत’च्या भावनेची बाधा का झाली आहे?
राजधानी दिल्लीच्या सिमेवर शेतकर्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाने आता सत्तर दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. रस्त्यांवरिल आंदोलने आणि चळवळी संपत चालल्याचे चित्र असतानाच्या काळात हटवादी सत्तेविरोधात एखादे इतके प्रदिर्घ आंदोलन पाहण्याची या देशाला मागच्या काही वर्षात सवय राहिलेली नाही. त्यामुळेच हे आंदोलन सर्वांसाठीच एक वेगळे आंदोलन ठरले आहे.
कलाकार, खेळाडू हे त्यांच्या कलेमुळे आणि खेळामुळे मोठे होतात हे खरे असले तरी त्यांना महान करण्यामागे जनभावना असतात. त्यामुळे त्यांनी जनभावनांचा आदर करणे अपेक्षित असते. मात्र हे लोक ज्यावेळी जनभावनेऐवजी सत्तेच्या पालखिचे भोई होऊ पाहतात त्यावेळी त्यांच्याबद्दलच्या आदराला देखिल धक्का लागत असतो. देशातील शेतकरी 70 दिवसांपासून आंदोलन करतोय त्यावर ज्यांना एक चकार शब्द बोलावा वाटला नाही, त्या सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीला शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय समर्थन मिळून लागताच कंठ का फुटावा? हे समजायला मार्ग नाही. शेतकरी आंदोलनाच्या बाजुने आंतरराष्ट्रीय मंचावर प्रतिक्रिया उमटू लागताच सत्तेच्या पालखिचे भोई बनलेल्या या लोकांना प्रचंड मिरच्या लागल्या आहेत. आतापर्यंत या प्रश्नावर गप्प असलेले हे भक्तगण आता ‘हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे’ असे म्हणत देशभक्तीचा नवा सूर लावू पाहत आहेत. बाकी आपल्या गाडीवरचा कर देखील देशाच्या तिजोरित जाऊ नये यासाठी करमाफिची याचना करणार्या किंवा उड्डाणपूल बांधला तर देश सोडून जाण्याची धमकी देणार्या लोकांच्या देशभक्तीचा दर्जा काय आहे? हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही.
या लोकांचे दुटप्पी वर्तन नवे नाही. आज शेतकरी आंदोलन ‘देशांतर्गत’ म्हणणारे ज्यावेळी पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचा जणू प्रचारच करीत होते, त्यावेळी मात्र कोणत्या तरी बिळात जाऊन बसले होते. ज्यावेळी पंतप्रधान लोकसभेतील भाषणात संस्कृत मधील उतारे वाचून ‘वसुधैव कुटुंबकमव’ ची आपली संस्कृती असल्याचे सांगत होते, त्यावेळी बाके आणि टाळया वाजविणार्यांना आता ‘वसुधैव’ चा विसर का पडला आहे? आज ‘देशांतर्गत’ च्या नावाने छात्या बडविणारे जुने प्रसंग विसरले आहेत का?
सिंहासन खाली करो की जनता आती है
शेतकरी आंदोलनाचे नेमके भवितव्य काय यावर बोलताना राकेश टिकैत यांनी ‘तख्त भी छोडना पड सकता है’ अशी प्रतिक्रिया दिली. सरकार जर ऐकत नसेल तर सत्ताबदलासाठी जनमत निर्मीती ही लोकशाही प्रक्रिया असते. मात्र टिकैत यांची ही प्रतिक्रिया काहींना लगेच ‘आंदोलनातले राजकारण’ वाटू लागली आहे. गोदीमिडीया आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी लगेच तसा प्रचार सुरु केला आहे. ज्यांनी आणिबाणी अनुभवली किंवा पाहिलेली नाही, त्यांना कदाचित माहिती नसेल, पण जे लोक आणिबाणीत लढलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक माणतात, त्यांना सरकारी मानधन देतात, त्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि माध्यमांना तरी ‘सिंहासन खाली करो, की जनता आती है’ या घोषणेचा विसर पडू नये, ही घोषणा जर जनआंदोलन असेल तळ टिकैत यांच्या ‘तख्तभी छोडना पड सकता है’ मध्येच वावगे काय वाटत आहे?