दुखरी बाजू /संजय मालाणी
बीड दि. २५ : राजकारणात विरोधकांवर टीकाटिपण्णी करावीच लागते, त्यात काही गैर नाही. मात्र कोणावर टीका करताना आपण त्याच व्यक्तीबद्दल यापूर्वी काय बोललो होतो याचे भान असावे लागते. किमान अजित पवारांना लोक ज्या उंचीवरचा म्हणून पाहतात , त्या अजित पवारांनी तरी तसे भान ठेवायला हवे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार गल्लीतल्या कार्यकर्त्यासारखे आरोप करणार असतील तर बीडची जनता त्यांना दूधखुळी वाटते का? अगदी एक वर्षांपूर्वीच अजित पवारांनी ज्यांच्या प्रचारात क्षीरसागरांची वारेमाप स्तुती केली होती, किंबहुना मागच्या २०-२५ वर्षात ज्या अजित पवारांनी कितीतरीवेळा बीडमध्ये येऊन क्षीरसागर आणि विकास हे कसे समीकरण आहे ते सांगितले, त्याच अजित पवारांना अचानक बीडमध्ये ३५ वर्षात काहीच झाले नाही आणि सगळीकडे भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार होत असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा ?
काँग्रेस, त्यानंतरची राष्ट्रवादी आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादी , या साऱ्या राजकारणात पवार कुटुंबाला बीडमध्ये साथ दिली, किंवा पवारांना बीडमध्ये आवश्यकता वाटली ती क्षीरसागरांचीच. पवारांनी बीड जिल्ह्यात आणि बीड मतदारसंघात अनेक प्रयोग केले,नाही असे नाही , मात्र शेवटी त्यांचा शोध संपायचा तो क्षीरसागरांवरच. अगदी आता अजित पवारांनी काकांच्या पक्षावर ताबा मारला , त्यानंतर देखील त्यांना बीडमध्ये गवसले ते क्षीरसागरच. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाची उमेदवारी होती ती डॉ. योगेश क्षीरसागरांना. हे तेच योगेश क्षीरसागर आहेत, ज्यांच्या घराण्यात मागच्या ३५ वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता असल्याचे अजित पवार भाषणात बोलले.
प्रचाराच्या भाषणात टीका, आरोप नवीन नाहीत. पण या घराण्याने मागच्या ३५ वर्षात बीडमध्ये काहीच केले नाही, काय तुमचे रस्ते, काय तुमच्या नाल्या आणि आणखी काय काय म्हणून अजित पवारांनी बीडला हिनवले. बीडच्या विकासाचाही भूक अजूनही भागलेली नाही हे वास्तव आहे. बीडमध्ये मागच्या ३५ वर्षात काही झाले किंवा नाही, यावरून वाद असू शकतात.पण हा प्रश्न अजित पवारांनी विचारावा ? याच अजित पवारांनी मागच्या २० वर्षात बीडमध्ये कितीवेळा येऊन कशाकशाची भूमिपूजन, उदघाटन केले, किती सभा घेतल्या, त्या प्रत्येकवेळी क्षीरसागरांच्या माध्यमातून आमचे सरकार बीडचा विकास कसा करत आहे, याबद्दल काय काय भाषणे केली होती, याची थोडी जरी आठवण अजित पवारांसारख्या मोठ्या उंचीवरच्या नेत्याला असणे अपेक्षित आहे. बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाने काही केले किंवा नाही, हा भाग ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून वेगळा असेल,मात्र मागच्या २५ वर्षात याच क्षीरसागरांच्या कौतुकाचे जे पाढे अजित पवारांनीच वाचले होते , ते बीडकरांनी कसे विसरायचे ?
आता राहिला प्रश्न शहराच्या आजच्या परिस्थितीचा, तर अजित पवारांकडे बीडचे पालकत्व येऊन आता ८-१० महिने झाले आहेतच. शहरावर प्रशासकाची म्हणजे तशी पालकमंत्र्यांचीच सत्ता , मग त्यांनी असे काय बदल केले?आजही अजित पवार येणार असतील तरच रस्ते स्वच्छ होतात, नाल्या साफ होतात, याही पावसाळ्यात लोकांच्या घरात, दुकानात पावसाचे पाणी गेलेच , अजूनही रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढीग आहेतच , प्रशासन दाखवेल तितकेच पाहायचे आणि 'मी कसा कामाचा माणूस आहे' हे सांगत फिरल्याने बीडचा चेहरा बदलेल असे समजून घ्यायला अजित पवारांना बीडकर दुधखुळे वाटतात का ?

प्रजापत्र | Wednesday, 26/11/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
