Advertisement

पवनचक्की उभारणी तील 'मध्यस्थां' चा  सुळसुळाट बंद करा- पालकमंत्री सरनाईक 

प्रजापत्र | Tuesday, 04/11/2025
बातमी शेअर करा

धाराशिव-  जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या उभारण्या चा उद्योग वेगाने विस्तारत आहे. पवनचक्की उभारणी साठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे!  त्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील ' मध्यस्थ ' या नावाखाली वाढलेला दलालांचा सुळसुळाट बंद करा. असे आदेश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
   ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते .या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, जिल्हा पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या सह पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
   मंत्री सरनाईक म्हणाले की, पवन चक्क्या उभारणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने मध्यस्थ म्हणून काम केले पाहिजे,  शेतकरी आणि संबंधित कंपनी याच्यामध्ये तयार झालेले दलाल हे गुंडगिरी करून शेतकऱ्यांना धमकवतात, तसेच त्याला योग्य मोबदला मिळू देण्यापासून वंचित ठेवतात. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो (Suo Moto ) गुन्हे दाखल करावेत. अशा गुंडांच्या पासून जिल्ह्यात  निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करणे देखील आवश्यक आहे. पवनचक्की उभारणी उद्योगातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जावे, त्याची फसवणूक होणार नाही.  यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष रहावे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement