मुंबई, 3 जानेवारी : महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी हायकमांडने हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दूर करत या पदासाठी दुसऱ्या नेत्याला संधी देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्त्वाकडून केला जात आहे. पण हा बदल फक्त प्रदेशाध्यपदापुरताच मर्यादित असणार नाही, तर पक्ष संघटनेत इतरही अनेक बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासोबत कार्याध्यक्षपदावरही बदल करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात काँग्रेसचे पाच कार्याध्यक्ष आहेत. ही संख्या वाढवून आहे त्या कार्याध्यक्षांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेत्यांकडेच पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका देण्यापेक्षा पूर्णवेळ काम करू शकणाऱ्या नेत्यांकडे संघटनेची जबाबदारी द्यावी, याकडे काँग्रेस हायकमांडचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांबाबत दिल्लीत काँग्रेसकडून खलबतं सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एक हाय प्रोफाईल बैठक झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि एच. के. पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, अस्लम शेख, सुनील केदार, के.सी. पडवी आणि विश्वजीत कदम यांचा समावेश होता.
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची सर्वांसोबत प्रथम बैठक झाली. यामध्ये सर्वांची मतं जाणून घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक नेत्यासोबत वेगळी बैठक झाली, ज्यामध्ये प्रदेशाध्यपदाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.