Advertisement

एसपी अजित पवारांसोबत,कार्यालयाचे ध्वजारोहण प्रथमच अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते

प्रजापत्र | Thursday, 18/09/2025
बातमी शेअर करा

बीड-प्रशासनातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांची सोबत करणे इतके महत्वाचे वाटावे की त्यांनी आपल्या कार्यालयाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देखील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकावी याचा प्रत्यय अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात आला.मराठवाडा मुक्ती दिन असेल किंवा कोणताही राष्ट्रीय उत्सव, पोलीस अधीक्षक कार्यालयातील ध्वजारोहण कार्यालयप्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक करीत असतात.यावेळी मात्र पोलीस अधीक्षक पालकमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सोबत असल्याने असेल कदाचित पण एसपी कार्यालयातील ध्वजारोहणाची संधी मात्र अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाली.एसपी जिल्ह्यातच असताना एसपी कार्यालयातील ध्वजारोहण प्रथमच अप्पर पोलीस अधीक्षकांनी केले.
      राष्ट्रीय सण असलेल्या दिवशी शासकीय कार्यालयांचे ध्वजारोहण त्या कार्यालयाच्या प्रमुखांच्या हस्ते होत असते.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने देखील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्या-त्या कार्यालय प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बीडच्या एसपी कार्यालयात मात्र कार्यालयप्रमुख जरी पोलीस अधीक्षक असले आणि ते बीडमध्येच असताना येथील ध्वजारोहण अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.जिल्ह्यात मागच्या कित्येक वर्षात असे प्रथमच घडले. कदाचित प्रशासनाला पोलीस अधीक्षकांची उपस्थिती पालकमंत्री अजित पवार यांच्या कॅथलॅब उदघाटन, विश्रामगृह आणि इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी जास्त आवश्यक वाटली असावी, त्यामुळे मराठवाडा मुक्तिदिनाचे ध्वजारोहन करून घेण्याच्या सूचना एसपींनी ऐनवेळी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिल्या असाव्यात. अगदी कालपर्यंत बीडच्या एसपी कार्यालयाचे ध्वजारोहण अप्पर पोलीस अधीक्षक करतील असे कोणते आदेश निघाल्याची नोंद नव्हती.शेवटी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमाला स्वतः एसपींचीच उपस्थिती आवश्यक असल्यामुळे असेल कदाचित,पण अप्पर पोलीस अधीक्षकांना ध्वजारोहण करण्याचा मान मात्र मिळाला.

Advertisement

Advertisement