किल्लेधारुर दि.१७ (प्रतिनिधी): तालुक्यात गेल्या काही दिवसात होत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे मंगळवार (दि.१६)रोजी मोहखेड येथे आईसह ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन वर्षाच्या बालकाचा जीव गमावल्याची घटना घडली आहे.
धारूर तालुक्यातील मोहखेड येथे नाल्याला आलेल्या पुरातून आई सोबत घराकडे जात असताना मुलाचा वाहून गेल्याने मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (दि.१६) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. राम प्रकाश गवळी (वय २ ) असे मयत मुलाचे नाव आहे. मोहखेड शिवारात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पाऊस संपल्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्यांना चारा देण्यासाठी गेलेल्या आई राधाबाई, दोन मुली एक मुलगा राम असे आई सोबत गावाकडे येत होते . यावेळी नाल्याच्या पुरातून दोन मुलीला दुसऱ्या बाजूला सोडण्यासाठी आई गेली होती .दरम्यान दोन वर्षाच्या मुलास नाल्याच्या बाजूला उभा करण्यात आले होते . मुलींना नाल्यातून सोडत असताना पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे दोन मुली हातातून निसटून काही अंतरावर वाहून गेल्या . त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करून त्यांना वाचवले. दरम्यान उभा असलेला मुलगा पाण्यात गेल्याने तोही वाहून गेला . त्याला नागरिकांनी शोधले परंतु त्याचा मृत्यु झाला होता . त्यास मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. दरम्यान मागिल काही दिवसात पुरात वाहून जावून मृत्यू पावण्याची ही तिसरी घटना असून अजूनही पावसाच्या धारा सुरुच आहेत.