मुंबई: व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याच्या काही लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अशा लिंक या खोट्या असून नागरिकांनी त्यावर क्लिक करु नये असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केलं आहे.
येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने शहरातील अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाग घेण्याची प्रक्रियाही वेगळी असते. सध्या सोशल मीडियात अशा काही मोठ्या हॉटेल्सच्या नावे संदेश व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये फ्री कुपन अथवा फ्री गिफ्टचे प्रलोभन देण्यात येतंय. सोबत खाली एक लिंकही देण्यात येते. तर अशा लिंकवर नागरिकांनी क्लिक करु नये, त्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते असे आवाहन सायबर सेलने केलं आहे.
सायबर सेलने ताज हॉटेलच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशाच एका संदेशाचा संदर्भ देऊन ही माहिती दिली आहे. व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन आणि फ्री गिफ्ट देण्यात येत असल्याचा तो संदेश खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. ताज हॉटेलच्या वतीनंही हा संदेश खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून यावर पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.