केंद्रीय कृषीमंत्री निर्मला सीतारामनयांनी अर्थसंकल्प सादर केला. करोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच्या काळात हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानं सगळ्यांचंच याकडे लक्ष लागलं होतं. सरकार काय घोषणा करणार याचीही प्रतीक्षा नागरिकांना होती. अनेक महत्त्वाच्या घोषणा करताना सीतारामन यांनी वाहनांच्या स्क्रॅप पॉलिसीबद्दल मोठी घोषणा केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,”सरकार जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या वाहनांना टप्प्याटप्प्याने हटवण्यासाठी करण्यासाठी एक स्वतंत्र ऐच्छिक स्क्रॅप योजनेची घोषणा करत आहे. यामुळे इंधन दक्ष, पर्यावरणास अनुकूल वाहनांना प्रोत्साहित करण्यास तसेच वाहन प्रदूषण व तेल आयात खर्च कमी करण्यास मदत होईल. व्यक्तिगत वाहनांची २० वर्षांनंतर, तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करावी लागेल. या योजनेची सविस्तर माहिती संबंधित मंत्रालयाद्वारे दिली जाईल,” असं सीतारामन यांनी घोषणा करताना सांगितलं.
भारतातील सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला लवकरच अधिसूचित केले जाणार असून, १ एप्रिल २०२२ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच वाहन भंगार धोरणाला मान्यता दिली होती.