Advertisement

सरकारसोबत शेतकऱ्यांची बैठक

प्रजापत्र | Sunday, 31/01/2021
बातमी शेअर करा

दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी आंदोलनाचा 67वा दिवस आहे. आज शेतकरी नेते आणि सरकारमध्ये पुढील बैठकीची तारीख पक्की झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर येत्या 2 फेब्रुवारीला 13 वी बैठक ठरली आहे. काल(दि.30) सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांना 22 जानेवारीला दिलेला प्रस्ताव आजही कायम आहे.

दरम्यान, तिकडे गाजीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीमध्ये गाजीपूरला जाण्याची अपील केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी तिथे जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तवर पोलिसांनी सिंघू आणि गाजीपूर बॉर्डरवर सुरक्षा वाढवली आहे.

22 जानेवारीला झाली होती अखेरची बैठक

22 जानेवारीला सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये 12 वी बैठक झाली होती. यात सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की, नवीन कायद्यात कोणतेच बदल होणार नाहीत, तुम्ही(शेतकरी) आपल्या निर्णय सांगावा. यापुर्वी 20 जानेवारीला झालेल्या बैठकीत केंद्राने कायदे दिड वर्षांसाठी पुढे ढकलणे आणि एमएसपीवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता.

Advertisement

Advertisement