गडचिरोली : अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या ५ नक्षल महिलांना गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. यातील तिघींना अटक केली आहे. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या पाचही नक्षलींवर एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षीस होते.
उंगी मंगरु होयाम उर्फ सुमली (वय २८, रा.पल्ली, ता. भैमरगड, जि. बिजापूर), पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी (वय १९, रा.कोचल ता. आवापल्ली, जि. बिजापूर) व देवे कोसा पोडियाम उर्फ सविता (वय १९, रा. मारोट, ता. आवापल्ली, जि.बिजापूर) अशी अटकेतील नक्षलींची नावे आहेत. सर्वजण छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. इतर दोन नक्षली अल्पवयीन असून, त्यांच्याबद्दल ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार आहे. पोलिस अभिलेखावर दाखल गुन्ह्यांमध्ये या दोघांचा सहभाग आहे काय, याविषयी पडताळणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिनागुंडा येथे ५० ते ६० नक्षली एकत्र येऊन पोलिसांचा घातपात करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक सर्वश्री यतीश देशमुख, एम.रमेश व सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात आणि पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० ची ६ पथके आणि केंद्रीय राखीव दलाच्या ३७ क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांना १८ मे रोजी बिनागुंडा परिसरात रवाना करण्यात आले होते. १९ मे रोजी हे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना काही संशयित नागरिक आढळून आले. यातील काही जण हिरवे-काळे गणवेश परिधान केलेले, तर काही साध्या वेशभूषेतील होते. त्यांच्याकडे बंदुकादेखील होत्या. यातील ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, इतर जण जंगलात पसार झाले.
उंगी होयाम ही प्लाटून क्रमांक ३२ ची विभागीय समिती सदस्य आहे. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पल्लवी मिडियम ही प्लाटून क्रमांक ३२ ची पीपीसीएम असून, तिच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. देवे पोडियाम ही याच प्लाटूनची सदस्य असून, तिच्यावर ४ लाख रुपयांचे, तर अन्य दोन नक्षलींवर एकूण ८ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिसांनी सांगितले.
या नक्षलींकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, तीन एसएलआर रायफल, दोन भरमार बंदुका तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १०३ नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.