मुंबई : समाजात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डॉक्टर आणि वकील या पेशांसाठी जसा खास पोशाख असतो, तसाच पोशाख शिक्षकांसाठीही असायला हवा, असे मत व्यक्त करीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिक्षकांसाठीही गणवेशाचे संकेत शुक्रवारी दिले. ‘शिक्षकांना राज्य पातळीवर एकच गणवेश लागू होणार नाही. पण, शिक्षकांनी शाळेच्या स्तरावरच आपसात ठरवून एक गणवेश निश्चित करावा’, असे भुसे म्हणाले.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला ‘एक राज्य, एक गणवेश’ (One State,One Uniform) हा निर्णय बासनात गुंडाळणाऱ्या दादा भुसे यांनी शुक्रवारी मालेगावमध्ये एका कार्यक्रमात शिक्षकांच्या गणवेशाबाबत भाष्य केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या संबंधित जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकांनी एकसारखीच साडी नेसली होती. त्यांची ती वस्त्रांमधील एकवाक्यता आपल्याला प्रचंड भावली असून, राज्यभरातील शिक्षक बांधवांनी त्यातून प्रेरणा घ्यायची गरज असल्याचे आपल्याला जाणवले, असे दादा भुसे यांनी सांगितले.
‘शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत, याबाबतची वस्त्रसंहिता याआधीच लागू केली आहे. त्यामुळे आताचा मुद्दा शिक्षकांच्या गणवेशाचा आहे. शिक्षकांसाठी राज्य स्तरावर एकच एक गणवेश निश्चित केला जाणार नाही. त्याऐवजी (Dada Bhuse) प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना कोणता एकसमान गणवेश योग्य वाटतो, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळेला असेल. पण, त्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर येताना एकसमान असल्याचे जाणवले पाहिजे. ज्याप्रमाणे डॉक्टर, वकील यांना समाजात त्यांच्या गणवेशावरून लोक ओळखतात आणि मान देतात, तसाच मान शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या गावात गणवेशामुळे मिळावा, अशी अपेक्षाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.