मुंबई : शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे(Bacchu Kadu) बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात मैदानात उतरले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून उद्या रात्री (ता. ११) राज्यभर मशाल आंदोलन केलं जाणार आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवास्थानाबाहेर मशाल पेटवून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
एकीकडे बच्चू कडू कृषी (Bacchu kadu)मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करतील तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही, म्हणून बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत हे मशाल आंदोलन हाती घेतलं आहे. शेतकर्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या धोरणामुळे राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाहीत, अपंगांना द्यायला पैसे नाहीत. कोकाटे हे कृषीमंत्री आहेत, शेतकऱ्यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. तरी ते जबाबदारी झटक असतील तर त्यांची गाठ आमच्याशी आहे. ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकर्यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून निषेध नोंदवू असे ते म्हणाले. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बच्चू कडे पुढे म्हणाले, माणिकराव कोकाटे हे स्वत: शेतकरी आहेत. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांविषयी असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा वक्तव्याची त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, ते इतके बदलतील असे वाटले नव्हते. सरकारने भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितले होते. रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच पण जनतेसोबत देखील बेमान झाले. प्रभू रामचंद्राची शपथ ही बेइमानी आम्ही उखडून काढू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
महायुती सरकारमध्ये गेल्यावेळेला बच्चू कडे हे मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा घरोबा केला. विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेताना दिसत असतात. आता त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला असून सरकारला ते धारेवर धरणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.