डी. डी. बनसोडे/केज
सोलापूर दि.29 - मुलगा, नातू आणि दोन सुनांनी मिळून वृध्देची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या लोकांनी 168 तोळे सोने, 70 लाख रोकड परस्पर खात्यावरुन घेतल्याची तक्रार वृद्ध महिलेने केली. याप्रकरणी दोन सुना, नातू आणि नातवाच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
स्वतःचा मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करुन 80 वर्षीय वृद्ध महिलेची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे राकेशचा मित्र माशाळ आणि शिवानंद नागपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादीचे पती महादेव यांनी मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीच्या नावे 70 लाख रुपयांची ठेव ठेवली होती. तसेच, 20 लाख रुपये हे जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून एका पतसंस्थेत ठेवले होते. मात्र, आपला मुलगा, नातू तसेच दोन सुना यांनी बनावट कागपत्रे तयार करुन पतसंस्थेतील सर्व ठेवी स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचा आरोप तक्रारदार वृध्द महिलेने केला आहे. तसेच, 150 तोळ्याहून अधिकचे सोने देखील काढून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे. तक्रारदार वृद्ध महिलेच्या पतीने आपल्या ठेवी एका पतसंस्थेत ठेवल्या होत्या. आरोपींनी हे पैसे कसे वळते केले या बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.