बीड दि.29 (प्रतिनिधी)-एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू लागले असताना खाद्य तेलांचे दर काही प्रमाणात घटू लागल्याचे चित्र आहे.सध्या बीडमध्ये पेट्रोलने 94 रुपयांचा आकडा पार केला असून डिझेल 84 रुपयांच्या घरात गेले आहे.इंधनातील सातत्याने होणार्या दरवाढीमुळे जनता त्रस्त असताना खाद्य तेलांचे दर किलोमागे तीन रुपयांनी घटल्याने सर्व सामान्यांमध्ये ’काही खुशी काही गम’ असं वातावरण पाहायला मिळत आहे.
जानेवारीमध्ये इंधनात सलग दहाव्यांदा वाढ झाली.तर राजस्थानमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे.सध्या बीडमध्ये डिझेल 83.27 तर पेट्रोल 94.12 रुपयांच्या घरात गेले आहे.
सातत्याने होणार्या दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असून महाराष्ट्रात ही पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या घरात लवकरच जाण्याची शक्यता आहे.एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र खाद्य तेलांचे दर घटू लागल्याचे दिसून येते.पाम आणि सोयाबिनच्या किंमतीत किलोमागे तीन रुपयांनी घसरल्या आहेत. पाम तेलापासून शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन सर्व खाद्यतेलांच्या किंमती गेल्या काही महिन्यांत विक्रमी उंचीवर पोहोचल्या होत्या. एकट्या डिसेंबर महिन्यात तेलांच्या दारात 20 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीसह झालेल्या घटनाक्रमांनी याच्या किंमतीवर अंकुश लावला आणि आता यामध्ये दर कमी होऊ लागले.खाद्यतेलांमध्ये पाम तेल सर्वात स्वस्त असते आणि याचा वापर प्रामुख्याने होतो. पाम तेलाच्या जागतिक उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशियाची 85% हिस्सेदारी आहे. तज्ज्ञांनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यानंतर पाम तेलाच्या किंमतीत तेजी यायला सुरुवात झाली होती. पाम तेल महाग झाल्याने सूर्यफूल, मोहरी, शेंगदाण्यासह सर्व खाद्यतेलांच्या किंमतीत तेजी आली. मात्र, पाम तेलात पुन्हा नरमाई येत आहे. मलेशिया जैवइंधनात 20% आणि 40% पाम तेल मिसळण्याची आपली योजना वर्षभरासाठी लांबणीवर टाकत असल्याने पाम तेलाचे दर कोसळू लागले आहेत.आगामी महिन्याभरात यात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे.दरम्यान पामसोबत इतर खाद्य तेलांचे दर ही कोसळण्याची शक्यता आहे.
सोयाबिनच्या दरात घट
या वर्षी देशात सोयाबिनचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सोयाबिनचा वापर कुक्कुटपालन व्यवसायात होतो. या वर्षी अचानक बर्ड फ्लू आल्याने पोल्ट्रीतून मागणी घटली असल्याने सोयाबिनचे दर घसरू लागले आहेत.देशाची मोठी सोयाबीन बाजारपेठ इंदूरमध्ये सोयाबीनच्या किंमती 15% घटल्या असल्याचे नुकतेच समोर आले असून किरकोळ बाजाराठी सोयाबिनचे तेल 3 रुपयांनी किलोमागे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळते.
पावसाचा फटका आणि खिशाला
सध्या बाजारात तेल वगळता इतर सर्व वस्तू तेजीत आहेत.त्यात तेलांच्या महागाईचा उडालेला भडका आता काही प्रमाणात कमी होत असला तरी तूरडाळ तेजीत येणार आहे.तूरडाळीची प्रमुख उत्पादक राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे पिकांचे बरेच नुकसान झाले असून आगामी काळात तूरडाळीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यापार्यांच्या वतीने वर्तविण्यात आली.सध्या तूरडाळ बाजारात 65 रुपये किलोच्या घरात असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा