मुंबई : जागतिक महिला दिनाचे (Women's Day) औचित्य साधत उद्या ८ मार्च २०२५ रोजी राज्यभरातील सर्व (gramsabha)ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आय़ोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाच्या संपल्पनेनुसार (child marriage)बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागानं राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आय़ोजित करण्याचे निर्देश ६ मार्च २०२५ रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्य महिला आयोगानं २८ फेब्रुवारी २०२५ रोजी याबाबत कार्यवाही करण्याकरिता ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले होते.
तसंच केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अपर सचिवांनी देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना २१ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.याबाबत बोलताना महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) म्हणाल्या, "पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रुढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागते आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणार्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे.
संपूर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात महिलांना सन्मानाने वागवणे ही कर्तव्य भावना रुजवता येईल. महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही अशा प्रयत्नांतून बदलेल म्हणून आय़ोगाने ही संकल्पना मांडल्याचे त्यांनी सांगितले.