मुंबई- विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागाही जिंकता आल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. यातच (दि.३) मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावर आता Sanjay Shirsat संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. ‘विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम राहील’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत संजय राऊत देखील बोलले आहेत. असा प्रश्न विचारला असता संजय शिरसाट म्हणाले, “त्यांना संख्याबळ कळतं का? विरोधी पक्षनेतेपदासाठी किती संख्या पाहिजे? त्यांच्याकडे संख्याबळ असायला पाहिजे की नाही. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते काय निर्णय घेतील हा भाग वेगळा. पण कायदेशीररित्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेत कोणत्याच विरोधी पक्षाचा होऊ शकत नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.