Advertisement

शेतकरी आंदोलनात फूट

प्रजापत्र | Wednesday, 27/01/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-कृषी कायद्याच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत २२ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्या असून, २०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, कारवाईच्या काही वेळातच शेतकरी संघटना आंदोलनातून माघार घेतल्याचे दिसत आहे. बुधवारी (दि.२७) सायंकाळी साडेचार वाजता शेतकरी मजुर संघटनेने आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर केले. याच्या १५ मिनिटानंतर भारतीय शेतकरी यूनियननेही आंदोलनातून माघार घेतली.
राष्ट्रीय शेतकरी मजुर संघटनेचे चीफ वीएम सिंह म्हणाले की, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी घ्यावी. आम्ही अशा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीसोबत हे आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर करतो.
तिकडे, भारतीय शेतकरी यूनियन (भानु) चे अध्यक्ष भानुप्रताप सिंह म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत जे काही झाले, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. आम्ही मागील ६० दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेत आहोत. शेतकऱ्यांना उपाय हवाय, पण काही लोकांनी त्यांना पागल ठरवले. शेतकऱ्यांनी अशा नेत्याच्या मागे लागू नये, जो आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे.असे सांगून त्यांनी आंदोलनातून माघार घेतली.

Advertisement

Advertisement